Sunday, July 17, 2011

'राजकवी' भास्कर रामचंद्र तांबे





भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - इ.स. १९४१) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.'राजकवी' श्री. भास्कर रामचंद्र उर्फ भा.रा. तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७४ साली मध्यप्रदेशातील मुगावली या गावी झाला. प्रारंभीचे शिक्षण त्यांनी झांशी येथील पुसाळकर यांच्या खासगी शाळेत आणि त्यानंतर वैदिकाचे शिक्षण घेतले. 

मध्यप्रदेशात वास्तव्य असल्यामुळे हिंदी आणि उर्दू या भाषेचे त्यातील काव्याचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यानी प्रथम देवासच्या हायस्कूलमध्ये व नंतर युवराजांचे शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यांचे राजघराण्याबरोबर इंदूरला वास्तव्य होते. तेथे संस्थांचे दिवाण, सरकारी वकील, न्यायाधीश, शिक्षण खात्यात रजिस्ट्रार इत्यादी पदे भूषविली. १९३७ मध्ये "ग्वाल्हेरचे राजकवी" हा बहुमान त्यांना मिळाला.

साधारण १९०० साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांनी सुनीत या काव्य प्रकारात काही कविता लिहिल्या. या स्वतंत्र प्रतिभेच्या कविने नाट्यगीतेही लिहिली. त्या काळातील सुप्रसिद्ध मध्य भारतीय कवी संमेलनाचे १९२६ मध्ये ते अध्यक्ष होते. १९३२ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला.

अशा या सौंदर्यवादी, भावनाप्रधान कवीचे ७ डिसेंबर १९४१ साली निधन झाले. पण आपल्या काव्यामुळे ते आजही अजरामर आहेत.
काव्य्संग्रहः
१. भास्कर रामचंद्र तांबे यांची कविता,
संपा. : वा. गो. मायदेव (१९२०)
२. तांबे यांची कविता, भाग २ रा,
संपा. : दि. गं. केळकर ( १९२७)
भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता,
संपा. : मा. त्रिं. पटवर्धन ( १९३५ )

त्यांच्या काही प्रसिध्द कविता -

  • जन पळभर म्हणतिल हाय हाय!
  • नववधू प्रिया मी बावरते
  • कळा ज्या लागल्या जीवा
  • मावळत्या दिनकरा
  • तिन्ही सांजा सखे मिळाल्या



नववधू प्रिया मी बावरते

नववधू प्रिया मी बावरते. लाजते, पुढे सरते, फिरते ॥ ध्रु ॥
कळे मला प्राणसुखा जरि, कळे तूच आधार सुखा जरी
तुजवाचुनि संसार फुका जरि, मन जवळ यावया गांगरते ॥ १ ॥
मला येथला लागला लळा, सासरी निघता दाटतो गळा
बागाबगीचा येथला मळा, सोडिता कसे मन चाचरते ॥ २ ॥
जीव मनीचा मनी तळमळे, वाटे बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे, परि काय करु, उरी भरभरते ॥ ३ ॥
चित्र तुझे घेउनि उरावरि, हारतुरे घालिते परोपरि,
छायेवरि संतोष खुळी करि, तू बोलविता परि थरथरते ॥ ४ ॥
अतां तूच भय लाज हरी रे, धीर देउनी ने नवरी रे
भरोत भरतिल नेत्र जरी रे, कळ पळभर मात्र, खरे घर ते ॥ ५ ॥
गायक/गायिका: 
लता मंगेशकर
संगीतकार: 
वसंत प्रभु
गीतकार: 
भा.रा.तांबे
अधिक टिपा: 
चवथे कडवे लताने गायलेले नाही


जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’

जन पळभर म्हणतिल ‘हाय हाय’
मी जाता राहिल कार्य काय?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय?

मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल
पुन्हा तटावर हेच पाय?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जातां त्यांचे काय जाय?

रामकृष्णही आले, गेले
त्यांविण जग का ओसचि पडले?
कुणी सदोदित सूतक धरिले?
मग काय अटकले मजशिवाय?

अशा जगास्तव काय कुढावे?
मोहि कुणाच्या कां गुंतावे?
हरिदूता कां विन्मुख व्हावे?
कां जिरवुं नये शांतीत काय?

~भा. रा. तांबे 

संगीत वसंत प्रभू
स्वर लता मंगेशकर 




मावळत्या दिनकरा
मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज 
जोडुनि दोन्ही करा !


जो तो वंदन करी उगवत्या, 
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा 

उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण; 
जगात भरले तोंडपूजेपण, 
धरी पाठिवर शरा !

आसक्त परि तू केलीस वणवण, 
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा !

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर 
होति दयामृदु नयनिष्ठुर कर 
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा ! 

~भा.रा.तांबे

कळा ज्या लागल्या जीवा...
कळा ज्या लागल्या जीवा मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?
उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,
जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.
नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.
नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढिती मागे मला बांधोनी पाशांनी.
कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे?
तटातट काळिजाचे हे तुटाया लागती धागे.
पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !

कवी - भास्कर रामचंद्र तांबे

मरणांत खरोखर जग जगते

मरणांत खरोखर जग जगते
अधीं मरण अमरपण ये मग ते

अनंत मरणे आधीं मरावी
स्वातंत्र्याची आस धरावी
मारील मरणचि मरणा भावी
मग चिरंजीवपण ये मग ते

सर्वस्वाचे दान आधीं करी
सर्वस्वच ये तुझ्या घरी
सर्वस्वाचा यज्ञ करी तरी
रे! स्वयें सैल बंधन पडते

स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा
का यज्ञाविण काही मिळते?

सीता सति यज्ञीं दे निज बळी
उजळुनि ये सोन्याची पुतळी
बळी देऊनी बळी हो बळी
यज्ञेच पुढे पाऊल पडते

यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो
स्वसत्वदाने पाश छेदितो
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो
रे स्वभाव हा! उलटे भलते

प्रकृति-गती ही मनिं उपजुनियां
उठा वीर कार्पंण्य त्यजुनिया;
'जय हर!'गर्जा मातेस्तव या!
बडबडुनी काही का मिळते?

भा.रा.तांबे
सायंकाळची शोभा
पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर

झाडांनी किती मुकुट घातले डोईस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी

हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर त-हेत-हेचे इंद्रधनुष्यांचे

अशी अचल फुलपाखरे, फुले साळीस जणू झुलती
साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती.

झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती!
हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती!

पहा पांखरे चरोनी होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?
~भा. रा. तांबे

या बालांनो..

या बालांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !
मजा करा रे, मजा मजा !
आज दिवस तुमचा समजा.
स्वस्थ बसे,
तोचि फसे;
नवभूमी
दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया.
या बालांनो ! या रे या !
लवकर भरभर सारे या !

खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहुंबाज भरे;
जिकडे तिकडे फुलें फळें,
सुवास पसरे, रसहि गळे.
पर जयांचे,
सोन्याचे
ते रावे,
हेरावे.
तर मग कामें टाकुनी या
नवी बघाया ही दुनिया !
या बालांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

पंख पाचुचे मोरांना,
टिपति पांखरें मोत्यांना,
पंख फडकती घोड्यांना,
मौज दिसे ही थोड्यांना.
चपलगती,
हरिण किती !
देखावे
देखावे
तर मग लवकर धावुनी या 
नवी बघाया ही दुनिया !
या बालांनो, या रे या
लवकर भरभर सारे या !
~भा. रा. तांबे

रुद्रास आवाहन
डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकत ये, येई रुद्रा!
प्रलयघनभैरवा, करीत कर्कश खा
क्रूर विक्राळ घे क्रुध्द मुद्रा !

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षीका,
खडबडवी दिग्गजां, तुडव रविमालीका,
मांड वादळ, उधळ गिरी जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां !

पाड सिंहासने दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे, करटी भूपाप्रती,
झाड खटखट तुझें खड़ग क्षुद्रां !

जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे
"शांति ही!" बापुडे बडबडती जन-कीडे !
धडधडा फोड तट! रुद्र ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा !

पूर्वी नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयीं अन्य गृहीं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा!
~भा. रा. तांबे

तिन्ही सांजा सखे मिळाल्या
तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला
आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला
तिन्ही सांजा…

कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा
चक्रवाल हे पवित्र ये जी शांत गंभीर निशा
त्रिलोकगामी मारूत, तैशा निर्मल दाहि दिशा
साक्षी ऐसे अमर करूनि हे तव कर करि धरिला
तिन्ही सांजा…

नाद ऐसा वेणूत, रस जसा सुंदर कवनांत
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षात
पाणी जसे मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णात
हृदयी मी साठवी तुज तसा जिवित जो मजला
तिन्ही सांजा…
.
गीत : भा० रा० तांबे 
संगीत: पं० हृदयनाथ मंगेशकर
गायिका: लता मंगेशकर
राग: मिश्र यमन
डोळे हे जुलमि गडे
डोळे हे जुलमि गडे
रोखुनी मज पाहू नका
जादूगरी त्यात पुरी
येथे उभे राहु नका

घालु कशी कशिदा मी?
होति किती सांगु चुका
भोचे सुई फिरफिरुनी
वेळ सख्या, जाय फुका

खळबळ किती होय मनी
हसतिल मज सर्वजणि
योतिल तय संधि बघुनी
आग उगा लावु नका

~कवी : भा. रा. तांबे
संगीत : वसंत प्रभु
गायिका : आशा भोसले














No comments:

Post a Comment