Saturday, June 25, 2011

तुकारामांचे निवडक अभंग

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥1॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि स्वरूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥2॥
तुका ह्मणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥3॥

==============================================

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें । पक्षी ही सुस्वरे आरवीती ॥१॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथ्वी आसन । रमे तेथे मन क्रिडा करी ॥३॥
कंथा कमंडलू देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥
हरि कथा भोजन परवडी विस्तार । करुनी प्रकार रुची सेवू ॥५॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी ॥६॥

===============================================
अमृताहूनि गोड नाम तुझे देवा। मन माझे केशवा कां बा नेघे ॥१॥
सांग पंढरिराया काय करू यांसी । का रूप ध्यानासी न येत तुझे ॥२॥
कीर्तनी बैसता निद्रे नागविले । मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जति हरिनामाच्या कीर्ति । नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥

===============================================
सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे ॥१॥
आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड । तुझे नाम गोड पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मी ऐसे मागितले तुज । आम्हासी सहज द्यावे आता ॥३॥
तुका म्हणे तुज ऐसे दयाळ । धुंडिता सकळ नाही आम्हा ॥४॥

================================================

कन्या सासुरासी जाये,मागे परतोनी पाहे|
तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा||
चुकिलया माये, बाळ हुरुहुरु पाहे|
जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी||

================================================
रुपे सुंदर सावळा गे माये वेणु वाजवी | वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु | वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हती घेऊन काठी |वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी | करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥ 

=================================================

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥ 

=================================================
नामाची आवडी तोचि जाणा देव| न धरी संदेह काही मनी||
ऐसे मी हे बोलत नाही नेणतां| आनुनि संमता संतांचिया||
नाम म्हणे तया आणीक साधन| ऐसे हे वचन बोलों नये||
तुका म्हणे सुखे पावे य वचनी| ज्याचीं शुद्ध दोन्ही मायेबाप||

=================================================
राजस सुकुमार मदनाचा पुतळा| रविशशिकळा लोपलिया||
कस्तुरी मळवट चंदनाची उटी| रूळे माळ कंठी वैजयंती||
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें| सुखाचे ओतले सकळ ही||
कासे सोनसळा पांघरे पाटोळा| घननीळ सांवळा बाइयानो||
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा| तुका म्हणे जीवा वीर नाही||

=================================================

येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥
काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥
काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥
काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥
धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥
काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥
रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥

=================================================
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा | भक्ताचिया काजा पावतसे ||१||
पावतसे महासंकटी निर्वाणी | रामनाम वाणी उच्चारीता ||२||
उच्चारिता नाम होय पापक्षय | पुण्याचा निश्चय,पुण्यभूमी ||३||
पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे |पापिया नाठवे काही केल्या ||४||
काही केल्या तुझे मन पालटेना | दास म्हणे जना,सावधान ||५|| 

=================================================
माझा कुळस्वामी कैलासीचा राजा | भक्ताचिया काजा पावतसे ||१||
पावतसे दशभुजा उचलून | माझा पंचानन कैवारी ||२||
कैवारी देव ,व्याघ्राच्या स्वरूपे | कोपे भूमंडळ जाळू शके ||३||
जाळू शके सृष्टी उघडिता दृष्टी | तेथे कोण गोष्टी आणिकांची ||४||
आणिकांची महती शंकराखालती | वाचविली क्षिती,दास म्हणे ||५||

=================================================
कैवारी हनुमान, आमुचा ॥
पाठीं असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान
नित्य निरंतर रक्षी नानापरी । धरूनिया अभिमान
द्रोणागिरि करि घेउनि आला । लक्ष्मणप्राणनिधान
दासानुदासा हा भरंवसा । वहातसे त्याची आण 

=================================================
आम्ही काय कुणाचे खातों । श्रीराम आम्हाला देतो
बांधिले घुमट किल्ल्याचे तट । तयाला फुटती पिंपळवट
नाहीं विहीर आणी मोट । बुडाला पाणी कोण पाजीतो
खडक फोडितां सजिव रोडकी । पाहिली सर्वांनी बेडकी
सिंधु नसता तिये मुखीं । पाणी कोण पाजीतो
नसतां पाण्याचे बुडबुडे । सदासर्वदा गगन कोरडें
दास म्हणे जीवन चहुंकडे । घालुनी सडे पीक उगवितो

=================================================
मन हे विवेकें विशाळ करावें । मग आठवावें परब्रह्म ॥
परब्रह्म मनीं तरीच निवळें । जरी बोधें गळे अहंकार ॥
अहंकार गळे संतांचे संगतीं । मग आदि अंतीं समाधान ॥
समाधान घडे स्वरूपीं राहतां । विवेक पाहतां नि:संगाचा ॥
नि:संगाचा संग सदृढ धरावा । संसार तरावा दास म्हणे ॥

================================================
समाधि साधन संजीवन नाम । शांति दया, सम सर्वांभूतीं ॥१॥
शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू । हरिनाम उच्चारू दिधला तेणें ॥२॥
यम-दम-कळा, विज्ञानेंसी ज्ञान । परतोनि अज्ञान न ये घरा ॥३॥
ज्ञानदेवा सिद्दी-साधन अवीट । भक्ति-मार्ग नीट हरिपंथीं ॥४॥

================================================

5 comments:

  1. Pity on you..
    You mixed some of Ramadas's shlokas..
    Two rivals read together...LOL

    ReplyDelete
  2. Please do not mix shloks and abhang...

    ReplyDelete
  3. नामदेव सुद्धा मिसळोनी टाकलात राव.

    ReplyDelete
  4. वरील सर्व अभंग हे जगदगुरू तुकाराम महाराज यांचे नाहीत...

    ReplyDelete
  5. नामाची आवडी तोचि जाणा देव| न धरी संदेह काही मनी||
    ऐसे मी हे बोलत नाही नेणतां| आनुनि संमता संतांचिया||
    नाम म्हणे तया आणीक साधन| ऐसे हे वचन बोलों नये||
    तुका म्हणे सुखे पावे य वचनी| ज्याचीं शुद्ध दोन्ही मायेबाप||

    ततुमच्या मार्फत संत वचने आम्हा सर्वास वाचावयास मिळाली..धान्य तुमचे माता पिता ज्यांनी शुद्ध संस्कार तुमच्या वर केले...

    ReplyDelete