Friday, June 24, 2011

राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांच्या कविता


फूल ना फुलाची पाकळी


शहाजहानाआधी मेली ख्यालिखुशाली ती त्याची ।
खडा तेवढा ताजमहालच भूषा जी या जगताची ॥
चुकल्या तरुणा ! वेश्याक्रीडन आज तुझें स्मरणांत नसे ।
कालिदासकृत शाकुंतल परि सरस्वतीच्या कंठि असे ॥
खुनी खडयांनी भरले रांजण वाल्ह्याचे फुटले सारे ।
उरलें रामायण तें नटवी श्रीरामा निज आधारें ॥
गोकुळांतल्या चोराचा नच गोपींना आतां त्रास ।
श्रीकृष्णाची गीता उरली द्याया मरत्या उल्हास ॥
गडगडणें, काळोख, विजा हीं गेलीं वळवाच्या मागें!
अन्नब्रह्मची साक्ष तयाची द्याया हें राही जागें ॥
कांटे सुकले फांदीवरतीं - धन त्यांची झाली राना ।
गुलाब देवा, तुम्हा वाहिला, गोड करुनि तो कां घ्याना ॥
दूषण वगळुनि भूषणमात्रे प्रभुपूजन करि काळ असें ।
तुम्ही आम्ही कष्टी होणें हा कुठला मग न्याय असें? ॥
(अनुष्टुम्)
'गोविंदाग्रज' अपीं ही स्वभावें चरणांवरी ।
रसिका, घ्या फूल नाहीं फुलाची पाकळी तरी ॥

===============================================

एकच मागणे !


आहे जो विधिलेख भालिं लिहिला कोणास तो नाकळे ॥
आहे जो सुखदु:खभोग नशिबीं, कोणास तो ना टळे ॥
आहे जीवित हा हिशेब सगळा - हा बोध चित्तीं ठसे ।
देणें हें गतकालिचे सकळही सव्याज देणें असे ॥1 ॥

आशा मावळल्या; समूळ तुटले हृद्बंध नानापरी ।
इच्छा केवळ दु:खदा, अनुभवें हें बाणलें अंतरी ॥
आतां एकच मागणें तव पदी, देवा, असे एवढें ।
संसारी मिळता न तें, मन सदा शोकाग्नितापें कढे ॥2 ॥

आतां दु:ख नको, नकोच सुखही, होणार होवो सुखें ।
इच्छा वावरती मनांत, तरि हीं केली मुकी तन्मुखे ॥
''जें कांही घडते सदैव तुझिया इच्छाबळें तें घडे''
ऐसें जाणुनि सोसण्यास मज ते सध्दैर्य दे तेवढे ॥3॥



================================================

सांग कसे बसलों ?

भेट जहाली पहिल्या दिवशीं

परिचित नव्हतों कुणी कुणांशीं,
लाजुनि तेव्हां परस्परांशीं,
दूर - दूर- बसलों. ॥ 1 ॥

दिवस यापरी जातां चार,
लज्जा उरली नाहीं फार,
त्रास न होतां मग अनिवार -
जवळ जरा - आलों ॥ 2 ॥

यापरि गेले महिनें कांही,
परिचयास मग पार न राही,
लज्जा नुरतां तिळभर पाहीं -
सांग कसे बसलो ? ॥ 3 ॥

==================================================

पहिले चुंबन


जें मनास शिवले नाही । ठावे न कल्पनेलाही। सुख असे।
जे दिसे न कवण्या जागी। जे अवर्ण्य वाणीलागी। सुख असे।
कविताही प्रतिभाशाली। कल्पितां जयातें थकली। सुख असे।
एकदा । कष्टता सदा । पुढति नच कदा- ।
अनुभवा येई । ते पहिले चुंबन देई । सुख असे॥1॥

चित्रासह रमणी बसली। नवयौवन शोभा ठसली। तन्मुखी।
करि ठेवुनी कोमल गाला । करि विचार न कळे कसला। सारखी।
डोले न अथवा हाले । मग कुठले बोले चाले। चित्र ते।
रंजना। मुग्धयौवना। करित कल्पना।
भावी कालाची । (तुज ठावे) त्या दिवसाची। दिवस तो॥2॥

चित्र हे पाहुनी असले । नेत्रांचे सार्थक झाले। वाटले।
परि तरंग अद्भुत उठले। अनुभवा न पूर्वी आले। जे कधी।
जाउनी चोरटया चाली । झाकिले नयन करजाली। न कळता।
संभ्रमे । दचकली गमे। त्वरित विभ्रमे।
श्रमवि कर दोन्ही। काढाया नयनावरुनी । मम करा॥3॥

तो बघुनी उघडया गाला। उन्माद मानसी भरला। स्वैरसा।
संमोह पडे नयनांला। मज विसर जगाचा पडला। क्षणभरी।
ठेवुनी मुख सखीच्या गाली। आणिली गुलाबी लाली। त्यावरी।
हासली। फार लाजली। दूर जाहली।
एक निमिषांत। झिडकारुनी माझा हात। हसतची॥4॥

हा खेळ एक निमिषांचा। एकदाच अनुभव त्याचा । नच पुन्हा ।
ते वारे आले गेले। जन्माचे सार्थक झाले। परि गमे।
ते निमिष, स्थिती ती, सुख ते। चित्ताच्या दृष्टिस दिसते॥ सारखें! ॥
स्वानंद - कमलमकरंद। सुधानिस्यंद।
भूवरी आणी। जे वर्णावे ते कोणी । सुख तसे॥5॥

एकदाच अनुभव त्याचा । आरंभ अंत सौख्याचा। एकदां।
आयुष्य न त्याला क्षणही। जन्मही पुन्हां त्या नाहीं । एकदा ।
मनि चटका लावायासी। पाठवी दैव जणु त्यासी। एकदा।
निशिदिनी। वाटते मनीनित्य जन्मुनी।
मरण सोसावे । परि पहिले चुंबन घ्यावें । फिरुनिही॥6॥


=====================================================


एखाद्याचे नशीब

काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते ;
एकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते !

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हेमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला ;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवी यापरी
पाही कोण अशा हताश हृदया? जो तो असे आपला,
देवा ! तू तरि टाकि अश्रु वरुनी, त्यासाठी तो तापला !



~राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज 

3 comments:

  1. चांगली भेट दिलीत

    ReplyDelete
  2. यांची पाचदेविंचा पाळणा ही शिवरायांची कविता मिळेल?

    ReplyDelete
  3. सुंदर.... धन्यवाद.

    ReplyDelete