Tuesday, June 21, 2011

तुतारी - केशवसुत

तुतारी

====================


एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकीन जी मी स्वप्राणाने,
भेदुनी टाकिन सगळीं गगनें
दिर्घ जिच्या त्या किंकाळीनें;
अशी तुतारी द्या मजलागुनि.१

अवकाशाच्या ओसाडींतिल
पडसाद मुके जे आजवरी,
होतिल ते वाचाल सत्त्वरी
फुंक मारितां जीला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?२

सारंगी, ती सतार सुंदर
वीणा, बीनहि, मृदंग, बाजा,
सूरहि, सनई, अलगुज, माझ्या
कसची हीं हो पडतिल काजा?
एक तुतारी द्या तर सत्त्वर.३

रुढी जुलूम यांचीं भेसुर
सन्तानें राक्षसी तुम्हांला
फाडुनि खाती, ही हतवेला 
जल्शाची का? -पुसा मनाला,
तुतारिनें ह्या सावध व्हा तर! ४

अवडम्बरलीं ढगें किती तरि,
रविकिरणांचा चूर होतसे,
मोहर सगळा गळुनि जातसे
कीड पिकांवरि सर्वत्र दिसे!
गाफीलगिरी तरिहि जगावरि ५

चमत्कार! तें पुराण तेथुनि 
सुन्दर, सोज्वळ, गोडें मोठें,
अलिकडलें तें सगळें खोंटें
म्हणती, धरूनी ढेरी पोटें;
धिक्कार अशा मूर्खालागुनि! ६

जुन्या नभीं या ताजे तारक,
जुन्या भूमिवर नवी टवटवी,
जुना समुद्रहि नवरत्नें वी;
जुन्यांतून जी निष्पत्ति नवी...
काय नव्हे ती श्रेयस्कारक? ७

जुनें जाउं द्या मरणालागुनि,
जाळुनि किंवा पुरुनी टाका,
सडत न एक्या ठायीं ठाका,
सावध! ऐका पुढल्या हाका!
खांद्यास चला खांदा भिडवुनि! ८

प्राप्तकाल हा विशाल भूधर,
सुन्दर लेणीं तयांत खोदा,
नांवें अपुली त्यांवर नोंदा
बसुनी कां वाढवितां मेदा?
विक्रम कांहीं करा, चला तर!... ९

अटक कशाची बसलां घालुनि?
पूर्वज वदले त्यां गमलें तें-
ऐका खुशाल सादर चित्तें-
परंतु सरका विशंक पुढतें
निरोप त्यांचा ध्यानीं घेउनि! १०

निसर्ग निर्घृण त्याला मुर्वत
नाहिं अगदीं पाहा कशाची!
कालासह जी क्रीडा त्याची,
ती सकलांला समान जाची-
चुरूनी टाकी प्रचंड पर्वत! ११

त्याशी भिडुनि, झटुनी, झगडत
उठवा अपुले उंच मनोरे!
पुराण पडक्या सदनीं कां रे
भ्याड बसुनियां रडतां पोरें?
पुरुषार्थ नव्हे पडणें रखडत! १२

संघशक्तिच्या भुईंत खंदक
रुंद पडुनि शें तुकडे झाले,
स्वार्थानपेक्ष जीवीं अपुले
पाहिजेत ते सत्त्वर भरले;
घ्या त्यांत उड्या तर बेलाशक! १३

धार धरिलिया प्यार जिवावर,
रडतिल रडोत, रांडा पोरे,
गतशतकांचीं पापें घोरें
क्षालायाला तुमचीं रुधिरें...
पाहिजेत! स्त्रौण न व्हा तर! १४

ज्ॐ बघतें नांव लयाप्रत
तशांत बनलां मऊ मेंढरें,
अहह! घेरिलें आहे तिनिरें,
परन्तु होऊं नका बावरे-
धीराला दे प्रसंग हिंमत! १५

धर्माचें माजवूनि डम्बर,
नीतीला आणिती अडथळे,
विसरूनियां हें जातात खुळे
नीतीचे पद जेथें न ढळे
धर्म होतसे तेथेंच स्थिर १६

हल्ला करण्या तर दंभावर-तर बंडांवर,
शुरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे
तुतारिच्या ह्या सुराबरोबर! १७

नियमन मनुजासाठीं, मानव,
नसे नियमनासाठीं जाणा,
प्रगतिस जर तें हाणी टोणा,
झुगारुनी तें देऊनि, बाणा
मिरवा निज ओजाचा अभिनव! १८

घातक भलत्या प्रतिबन्धांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्नतिचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढें सरा रे
आवेशानें गर्जत 'हर हर'! १९

पूर्वीपासुनि अजुनि सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती;
संप्रती दानव फार माजती,
देवांवर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर! २०



कवी केशवसुत ( कृष्णाजी केशव दामले )जन्मः ७-१०-१८६६ मृत्यूः ७-११-१९०५ 
' कविवर्य केशवसुत' यांना 'आधुनिक मराठी कवितेचे जनक' म्हटले जाते. केशवसुत यांनी पारंपरिक कवितेचा चेहरामोहरा बदलून टाकला. आशय आणि अभिव्यक्ती यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आणि ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांसारख्या संतकवींच्या कवितेतील सामाजिक समतेचा विचार सर्वप्रथम आधुनिक मराठी कवितेमध्ये परिणामकारक रीतीने प्रकट केला. पाश्चिमात्य आधुनिक कवितेचे परिशीलन त्यांनी केलेले होते. पण त्याहून वेगळी वाट केशवसुतांच्या कवितेने चोखाळली. साध्याही विषयांतील थोर आशयांचा वेध घेत, जुन्या वृत्तरचनांचा आधार घेऊन त्यांनी काव्यरचना केलीच, पण 'सुनीत' सारखे नवे वृत्तही मराठी कवितेला प्रदान केले. त्यांची थोरवी त्यांच्या कवितेच्या आशयामध्ये दिसून येते. मानवतावाद, समता, विश्वबंधुत्व, रुढिभंजन, स्वातंत्रप्रेम, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार या मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या चिरंतन मूल्यांचा त्यांनी कवितेतून उद्घोष केला आणि आधुनिक मराठी कवितेचे लेणे, 'स्वप्राणांची तुतारी' फुंकून घडविले. त्यांच्या 'तुतारी', 'नवा शिपाई', 'स्फूर्ती', 'झपूर्झा', 'हरपले श्रेय' यासारख्या कविता म्हणजे मराठी कवितेचे, मराठी भाषेचे व महाराष्ट्राचे थोर वैभव होय.

No comments:

Post a Comment