Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

Sunday, November 6, 2011

भयकंपन



















पाऊसभोळा गोंदणवेळा पानावरती बिल्वचुडा 
जन्मजान्हवी तुझ्याचकाठी कृष्णसखीचा भरे घडा 

आर्त करुणा देई वेणा जळभाराची रात्र नवी 
श्लोकातून आरण्य दाटले शाल भयाची मला हवी 

पाऊसगाणी जणू विराणी काचेवरती एक चरा 
उत्तररात्री भिजल्या गात्री श्वासामधला हले झरा 

वैराणाचे आरण्यरुदन आज तमाच्या नदीतिरी 
रक्तचांदणे दाटून आले भयकंपाच्या आज घरी 

अशी सावळी मल्हाराची धून भिजवते बिल्वचुडा 
कृष्णघनाचे बिंब दाटले आज ऋतुवर स्वप्नसडा 


~विश्वराज जोशी, कोल्हापूर 
महाराष्ट्र टाईम्स ६/११/२०११ 

Sunday, August 7, 2011

आरती प्रभु

सेवेकरी मुद्रा असों नये बाशी
पहाटेस नेमें कातरावी मिशी

फाइलीची फीत रक्ताहून लाल
बाइलेची प्रीत सेकंदांशीं तोल

नको उमटाया स्तनावर वळ
सलामांचे हात असावे निर्मळ

कानाच्या भोकाशीं फक्त लाव फोन
इमानी ठेवावी धडावर मान

अश्रूंनाही म्हण वाळणार घाम
घाल आंतडीचा उरास लगाम

हृदयास म्हण हालणारा पंप
लाळेच्या तारेशी सदा असो कंप

गळ्यांतली वांती गळ्यांत ठेवून
पिंकदाणीतले शब्द घे वेचून

थोरांनी टाकिल्या श्वासां लाव नाक
कण्यासही हवे किंचीतसे पोक

सहीस जाताना मालवावी छाती
भ्रांतींत ठेवाव्या डोळ्यांतल्या वाती

नको पाहूं दूर भ्रमातला प्रांत
तुझ्या पायांसाठी कचेरीची वाट

~आरती प्रभु
७.०६.६०

Saturday, July 23, 2011

उठा उठा चिऊताई-कुसुमाग्रज


उठा उठा चिऊताई

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही

सोनेरी हे दूत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजुनही ?

लगबग पांखरे हीं
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचें मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या ?

बाळाचें मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दूर जाई
भूर भूर, भूर भूर,

~ कुसुमाग्रज

Thursday, July 21, 2011

काही कविता - कुसुमाग्रज



पृथ्वीचे प्रेमगीत 

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

~ कुसुमाग्रज
=====================================================
मंथर नाग

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग!

कधि लवचिक पाते खड्‍गाचे लवलवते,
कधि वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णांवर सुमने मोडुनि माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट!आनंद!
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तात नाहली,शिरमुंडावळ भाली
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर काली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान्‌ मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे,दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल,
अंगारकणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला!आला देख नकूल!

थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन्‌ आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी! की तडितेचा आघात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन्‌ पिशापरी त्वेषात!

रण काय भयानक, लोळे आग जळात!
आदळती,वळती,आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात!

क्षणि धुळीत गेली वहात तो विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वायापरि गेला नकुल वनातुनि दूर.

संग्राम सरे , रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!

~कुसुमाग्रज

=================================================
भेट अशी की...

भेट अशी की जिला पालवी
कधीच फुटली नाही
कोर शशीची घनपटलातून
कधीच सुटली नाही

मिठीविना कर रितेच राहिले
दिठीही फुलली नाही
ओठांमधली अदीम ऊर्मी
तशीच मिटली राही

युगायुगांचा निरोप होता
तोही कळला नाही
समीप येऊनी स्वर संवादी
राग न् जुळला काही

खंत नसे पण एक दिलासा
राहे हृदयी भरूनी
अलौकिकाची अशी पालखी
गेली दारावरूनी

~कुसुमाग्रज

'पाथेय' काव्यसंग्रहातून
============================================================
अनंत 
एकदा ऐकले काहींसें असें
असीम अनंत विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा इवला कण
त्यांतला आशिया भारत त्यांत
छोट्याशा शहरीं छोट्या घरांत

घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी
बांधून राहती कीटक कोळी


तैशीच सारी ही संसाररीती
आणिक तरीही अहंता किती?
परंतु वाटलें खरें का सारें?
क्षुद्र या देहांत जाणीव आहे
जिच्यात जगाची राणीव राहे!


कांचेच्या गोलांत बारीक तात
ओतीत रात्रीत प्रकाशधारा
तशीच माझ्या या दिव्याची वात
पाहते दूरच्या अपारतेंत!

अथवा नुरलें वेगळेंपण
अनंत काही जेंत्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं

वसंतवैभव उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा....प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें अंतरी झरे

त्यानेच माझिया करी हो दान
गणावे कसे हें क्षुद्र वा सान?

~ कुसुमाग्रज 
=======================================================
'कोलंबसचे गर्व गीत'

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
समुद्रा, डळमलु दे तारे !
विराट वादळ हेलकाउदे पर्वत पाण्याचे
ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान
मिळाया प्रमत्त थैमान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान

पदच्युता ,तव भिषन नर्तन असेच चालु दे
फ़ुटुदे नभ माथ्यावरती
आणि , तुटुदे अखंड ऊल्का वर्षावात अग्नी
नाविका ना कुठली भिती

सहकार्यानो, का हि खंत जन्म खलाशाचा
झूंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया लोटले
असे का आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधि सुखे , कशासाठी
जपावे पराभुत प्राणा

कोट्यावधी जगतात जिवाणु जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली
निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा ना रोधु शकतिल ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशान मिरवू महासागरात
जिंकु खंड खंड सारा !

चला उभारा 
शुभ्र  शिडे ति गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
” अनंत आमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला ”

~कुसुमा
ग्रज
=========================================================
बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते

असुराचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते

सह्यगिरीतिल वनराजांनो, या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायाला करा हिमाचल लक्ष खडे
समरपुरीचे वारकरी हो, समरदेवता बोलविते

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहात आजला एक मनीषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते
~ कुसुमाग्रज


Monday, July 11, 2011

आरती प्रभू



आरती प्रभू 


ज्येष्ठ मराठी लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर उर्फ कवी आरती प्रभू यांचा २६ एप्रिल हा स्मृतिदिन.
  


कवी आरती प्रभू किंवा लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांच्या 
उल्लेखाशिवाय मराठी साहित्याचा अभ्यास पूर्णच होऊ शकत नाही. 
चिं. त्र्य. खानोलकर यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी कुडाळमध्ये झाला.
 वडिलांचे छत्र लहानपणीच गेल्यावर आई हेच त्यांचे सर्वस्व झाले होते.


आरती प्रभूंचे शिक्षण फारसे झाले नव्हते. बेफिकीरप्रवृत्ती आणि धंद्यातील स्पर्धा यामुळे त्यांचा खाणावळीचा धंदा बसला. देणेक-यांची देणी वाढली. घरातील एकेक वस्तू विकून दिवस कंठण्याची वेळ आली. अशा आर्थिक ओढगस्तीमुळे खानोलकर त्रस्त झाले होते. शाळेत असल्यापासून खानोलकर आरती प्रभू या नावाने कविता करत होते आणि त्यांची पहिली कविता श्री. पू. भागवत यांनी सत्यकथेत छापली होती. खानोलकरांनी आपली हालाखीची स्थिती मधू मंगेश कर्णिकांना कळवली आणि एक दिवस अचानकपणे ते मुंबईत येऊन दाखल झाले.

कोकणात निसर्गाच्या सानिध्यात राहणारे खानोलकर मुंबईत मनापासून कधीच रमले नाहीत. त्यांच्यातील कवी निसर्गात आकंठपणे बुडालेला होता. त्यामुळे त्यांच्या बहुतेक सर्व कवितांमध्ये निसर्गच चित्रित केलेला दिसतो. अशा त्यांच्या या कवितांचा कवितासंग्रह जोगवा मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. याच दरम्यान त्यांची आकाशवाणीतील भाषण विभागात पाडगावकरांचा असिस्टंट म्हणून नेमणूक केली.

खानोलकरांचा जीवनपट म्हणजे नियतीचा सारीपटच होता असे म्हणावे लागेल. क्षणात प्रतिभेचे तेजनृत्य तर क्षणात विक्षिप्त स्वभावाची कतृत्त्वावर मात , असा नियतीचा सतत चाललेला खेळ त्यांना सातत्याने अनुभवावा लागला. श्री. पु. भागवत , मंगेश पाडगांवकर , मधु मंगेश कर्णिक , विजय तेंडुलकर यांच्यासारख्या प्रतिभावंत मित्रांनी खानोलकरांच्या प्रतिभेचा चमत्कार ओळखून त्यांना सतत मदत केली. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः हृदयनाथ मंगेशकर पुढे येतात आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ‘ ये रे घना ’, ‘ नाही कशी म्हणू तुला ’ सारखी गीते अमर होतात.

सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा हा माणूस ‘ रात्र काळी घागर काळी ’ सारखी कादंबरी लिहितो आणि हरी नारायण आपटे अभ्यासवृत्ती मिळवतो. ‘ अजगर ’सारख्या कादंबरीवर अत्र्यांसारख्याचे आसूड खातो. पुढे ‘ माकडाला चढली भांग ’नाटकाला अंत्र्याकडून शाबासकीही मिळवतो. आधुनिक नाटककारांबद्दल काही माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेने ‘ एक शून्य बाजीराव ’ सारखे नाटक लिहितो आणि रंगायनसारखी संस्था ते रंगभूमीवर आणते. एक इतिहास घडतो. ‘अवध्य ’ सारख्या नाटकातून रंगभूमी गाजवतो आणि मराठी नाटक वयात आल्याची ग्वाही माधव मनोहरांसारखा व्यासंगी समीक्षक मुक्तमनाने देतो. कोंडूरा कादंबरीचा अजब विषय सत्यजित रे सारख्या जागतिक कीर्तीच्या चित्रसम्राटाला टाकवून टाकतो आणि त्यावर चित्रपट काढावा असे त्याला वाटते. व्ही. शांतारामासारख्यांना चानी मोहात टाकते. अजब न्याय वर्तुळाचा जर्मनीपर्यंत पोहचते आणि नाट्यसृष्टीत एक चमत्कार घडतो.

८ मार्च १९३० रोजी कोकणच्या भूमीवर अवतरलेले नियतीच्या पटावरचे हे प्यादे २६ एप्रिल १९७६ पर्यंत अनेक चौकोनातून फिरत वेगवेगळ्या चालीने संचार करीत अखेर नियतीने पटाबाहेर नेले.

- अमिता जामखेडकर
(पुनर्मुद्रीत)
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर 

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (८ मार्च, इ.स. १९३०- २६ एप्रिल, इ.स. १९७६)
मराठी कवी, लेखक होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री खानावळ चालवीत.
तेथे गल्ल्यावर बसुन खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्‍या काही
मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने
'मौज' मधे छापण्यास पाठवुन दिल्या. मौज' च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित
झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.
ये रे घना
ये रे घना
न्हावूं घाल
माझ्या मना ...
खानोलकरांना भीती होती कि अचानक मिळालेल्या या प्रसिध्दीमुळे आपली प्रतिभा,
आपल्याला मिळालेली शब्दांची हि देणगी आपल्या हातुन निसटुन तर जाणार नाहीना.
पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधना पर्यंत मराठी
साहित्य सॄष्टीत तळपतच राहिला.
प्रकाशित साहित्य 

  • गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
  • कोंडुरा (कादंबरी, १९६६)
  • अजगर (कादंबरी, १९६५)
  • रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
  • त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
  • आपुले मरण
  • जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
  • दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
  • नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
  • पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
  • पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
  • सनई (कथा संग्रह, १९६४)
  • राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
  • चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
  • एक शुन्य बाजिराव (नाटक, १९६६)
  • सगेसोयरे (नाटक, १९६७)
  • अवध्य (नाटक, १९७२)
  • कालाय तस्मै नमः (नाटक १९७२)
  • अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)
पुरस्कार 
१९७८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार "नक्षत्रांचे देणे " साठी 

अंत झाला अस्ता आधी,जन्म एक व्याधि
वेदानांचे गाणे म्हणजे पोकळं समाधि
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौताम्य हे त्याच्या गळी साजे

कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?

दीप सारे जाती येथे विरून विझूनं
वृक्ष जाती अन्धारात गोठुन झडून
जिवानाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे 


कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ? 

कशासाठी उतरावे तम्बू ठोकुन
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगातात येथे कुणी मनात कुजुन
तरी कसे फुलंतात गुलाब हे ताजे

कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?

कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
~आरती प्रभू 





Monday, June 27, 2011

ग्रेस यांच्या कविता



पूर्ण नाव : माणिक सीताराम गोडघाटे 
जन्म : १० मे १९३७  नागपूर 
माणिक गोडघाटे हे कवी ग्रेस म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध आहेत. परमेश्वरी कृपा या अर्थाने त्यांनी हे साहित्यिक नाव धारण केले आहे. ’संध्याकाळच्या कविता’ या १९६७ साली प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहामुळे ते चर्चेत आले. अगदी अर्पणपत्रिकेपासून ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी देण्याची पद्धत अशा खास गोष्टी त्यांनी त्या पुस्तकाद्वारे आणल्या आणि ती परंपरा पुढेही चालू ठेवली. पाच काव्यसंग्रह आणि तितकेच ललितलेखसंग्रह ही साहित्यिक ग्रेस यांची (सर्वांना सहजपणे कळू शकणारी) कामगिरी आहे. "बाईला समजून घेणे हा माझ्यामधील पुरूषाचा पुरुषार्थ आहे" असे त्यांनी कित्येकदा जाहीरपणे सांगितले आहे. "परमेश्वराने विश्व निर्माण करताना चुका केल्या आहेत, त्या सुधारणे हा माझ्यासारख्या कलावंताचा धर्म आहे" असेही त्यांचे सांगणे आहे. आजमितीला ज्यांचे साहित्य उपलब्ध आहे त्या सर्व मराठी कवींपैकी ’समजण्यास अत्यंत अवघड’ इथपासून ते ’केवळ शब्द-अभियांत्रिकी, अर्थच नाही’ इथपर्यंतच्या टीका त्यांच्या कवितांवर झालेल्या आहेत.

प्रकाशित साहित्य

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
संध्याकाळच्या कविताकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९६७
राजपुत्र आणि डार्लिंगकवितासंग्रहअमेय प्रकाशन,पॉप्युलर प्रकाशन१९७४
चर्चबेलललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९७४
चंद्रमाधवीचे प्रदेशकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९७७
मितवाललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९८७
सांध्यपर्वातील वैष्णवीकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन१९९५
संध्यामग्न पुरुषाची लक्षणेललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२०००
मृगजळाचे बांधकामललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२००३
सांजभयाच्या साजणीकवितासंग्रहपॉप्युलर प्रकाशन२००६
वाऱ्याने हलते रानललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२००८
कावळे उडाले स्वामीललित लेखसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२०१०
निष्पर्ण तरुंची राई


भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई...



~ग्रेस 
ही कविता कवी ग्रेस यांच्या”चंद्रमाधवीचे प्रदेश” या काव्य संग्रहात आहे.
============================================================
घर थकले संन्यासी 


घर थकले संन्यासी : हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
धग ओढुनी संधेवानी आभाळ पसरले होते

पक्षांची घरटी होती : ते झाड तोडले कोणी
एक एक ओंजळी मागे असतेच झर्यांचे पाणी

मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई
~ग्रेस
============================================


ती गेली तेव्हा रिमझिंम , पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवीत होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता




चित्रपट : निवडुंग 
गीत : ग्रेस 
संगीत : प. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : प. हृदयनाथ मंगेशकर
=========================================


Friday, June 24, 2011

माधव ज्यूलियन यांच्या कविता


माधव जुलियन

(२१ जानेवारी, १८९४ - २९ नोव्हेंबर, १९३९)
माधव जुलियन ( माधव त्रिंबक पटवर्धन ) हे विसाव्या शतकाच्या सुरूवातिला होउन गेलेले मराठीतले अग्रणी कवी असून रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.
व्यवसायाने फारसी आणि इंग्रजी चे प्राध्यापक असलेल्या माधव जुलियन ह्यांना त्यांच्या मराठी कवितेने (उदा. "प्रेमस्वरूप आई", "मराठी असे आमुची मायबोली" सारख्या अजरामर कविता ) अपार प्रसिद्धी मिळवून दिली.
गझला व रुबाई (अनेकवचनः रुबायत. फारसी भाषेतला सुनितांचा एक प्रकार) हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय त्यांनाच देण्यात येते.
ते सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कर्ते होते व त्या अनुषंगाने त्यांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहीला होता. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सुची समाविष्ठ आहे.
ते शेले व ब्राऊनिंग ह्यांचे चाहते असून ह्या पश्चिमात्य कविंचा त्यांच्या काव्यलेखनावर बरांच प्रभाव होता. शेलेच्या "जुलियन आणि मडालो" वरुनच त्यांनी "जुलियन" हे नांव धारण केले होते.


पुरस्कार आणि गौरव

  • अध्यक्ष, १९३६ जळगाव चे मराठी साहित्य संमेलन.
  • "छंदोरचना" साठी मुंबई विद्यापिठाकडून डी. लिट. प्रदान. (मराठी साहित्यातील योगदाना बद्दल भारतातली पहिली डी. लिट.) 

प्रकाशित साहित्य

  • फारसी - मराठी शब्दकोष (१९२५)
  • विरह-तरंग (1926, खंडकाव्य)
  • स्वप्नलहरी (काव्यसंग्रह)
  • सुधारक (१९२८)
  • भाषाशुद्धि-विवेक
  • छंदोरचना (संशोधनात्मक)

प्रसिद्ध कविता

  • कशासाठी पोटासाठी
  • जीव तुला लोभला माझ्यावरी
  • प्रेम कोणीही करीना
  • प्रेमास्वरूप आई
  • मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली 

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूम चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥

=========================================
कशासाठी पोटासाठी 


कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी ! 

~माधव ज्यूलियन


बहु असोत सुंदर- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

बहु असोत सुंदर.... 
बहु असोत सुंदर संपन्न की महा 
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे 
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे 
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा 

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे 
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे 
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले 
भासति शतगुणित जरी असति एकले 
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती 
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती 
धर्म-राजकारण समवेत चालती 
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो 
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा 

- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांच्या कविता


फूल ना फुलाची पाकळी


शहाजहानाआधी मेली ख्यालिखुशाली ती त्याची ।
खडा तेवढा ताजमहालच भूषा जी या जगताची ॥
चुकल्या तरुणा ! वेश्याक्रीडन आज तुझें स्मरणांत नसे ।
कालिदासकृत शाकुंतल परि सरस्वतीच्या कंठि असे ॥
खुनी खडयांनी भरले रांजण वाल्ह्याचे फुटले सारे ।
उरलें रामायण तें नटवी श्रीरामा निज आधारें ॥
गोकुळांतल्या चोराचा नच गोपींना आतां त्रास ।
श्रीकृष्णाची गीता उरली द्याया मरत्या उल्हास ॥
गडगडणें, काळोख, विजा हीं गेलीं वळवाच्या मागें!
अन्नब्रह्मची साक्ष तयाची द्याया हें राही जागें ॥
कांटे सुकले फांदीवरतीं - धन त्यांची झाली राना ।
गुलाब देवा, तुम्हा वाहिला, गोड करुनि तो कां घ्याना ॥
दूषण वगळुनि भूषणमात्रे प्रभुपूजन करि काळ असें ।
तुम्ही आम्ही कष्टी होणें हा कुठला मग न्याय असें? ॥
(अनुष्टुम्)
'गोविंदाग्रज' अपीं ही स्वभावें चरणांवरी ।
रसिका, घ्या फूल नाहीं फुलाची पाकळी तरी ॥

===============================================

एकच मागणे !


आहे जो विधिलेख भालिं लिहिला कोणास तो नाकळे ॥
आहे जो सुखदु:खभोग नशिबीं, कोणास तो ना टळे ॥
आहे जीवित हा हिशेब सगळा - हा बोध चित्तीं ठसे ।
देणें हें गतकालिचे सकळही सव्याज देणें असे ॥1 ॥

आशा मावळल्या; समूळ तुटले हृद्बंध नानापरी ।
इच्छा केवळ दु:खदा, अनुभवें हें बाणलें अंतरी ॥
आतां एकच मागणें तव पदी, देवा, असे एवढें ।
संसारी मिळता न तें, मन सदा शोकाग्नितापें कढे ॥2 ॥

आतां दु:ख नको, नकोच सुखही, होणार होवो सुखें ।
इच्छा वावरती मनांत, तरि हीं केली मुकी तन्मुखे ॥
''जें कांही घडते सदैव तुझिया इच्छाबळें तें घडे''
ऐसें जाणुनि सोसण्यास मज ते सध्दैर्य दे तेवढे ॥3॥



================================================

सांग कसे बसलों ?

भेट जहाली पहिल्या दिवशीं

परिचित नव्हतों कुणी कुणांशीं,
लाजुनि तेव्हां परस्परांशीं,
दूर - दूर- बसलों. ॥ 1 ॥

दिवस यापरी जातां चार,
लज्जा उरली नाहीं फार,
त्रास न होतां मग अनिवार -
जवळ जरा - आलों ॥ 2 ॥

यापरि गेले महिनें कांही,
परिचयास मग पार न राही,
लज्जा नुरतां तिळभर पाहीं -
सांग कसे बसलो ? ॥ 3 ॥

==================================================

पहिले चुंबन


जें मनास शिवले नाही । ठावे न कल्पनेलाही। सुख असे।
जे दिसे न कवण्या जागी। जे अवर्ण्य वाणीलागी। सुख असे।
कविताही प्रतिभाशाली। कल्पितां जयातें थकली। सुख असे।
एकदा । कष्टता सदा । पुढति नच कदा- ।
अनुभवा येई । ते पहिले चुंबन देई । सुख असे॥1॥

चित्रासह रमणी बसली। नवयौवन शोभा ठसली। तन्मुखी।
करि ठेवुनी कोमल गाला । करि विचार न कळे कसला। सारखी।
डोले न अथवा हाले । मग कुठले बोले चाले। चित्र ते।
रंजना। मुग्धयौवना। करित कल्पना।
भावी कालाची । (तुज ठावे) त्या दिवसाची। दिवस तो॥2॥

चित्र हे पाहुनी असले । नेत्रांचे सार्थक झाले। वाटले।
परि तरंग अद्भुत उठले। अनुभवा न पूर्वी आले। जे कधी।
जाउनी चोरटया चाली । झाकिले नयन करजाली। न कळता।
संभ्रमे । दचकली गमे। त्वरित विभ्रमे।
श्रमवि कर दोन्ही। काढाया नयनावरुनी । मम करा॥3॥

तो बघुनी उघडया गाला। उन्माद मानसी भरला। स्वैरसा।
संमोह पडे नयनांला। मज विसर जगाचा पडला। क्षणभरी।
ठेवुनी मुख सखीच्या गाली। आणिली गुलाबी लाली। त्यावरी।
हासली। फार लाजली। दूर जाहली।
एक निमिषांत। झिडकारुनी माझा हात। हसतची॥4॥

हा खेळ एक निमिषांचा। एकदाच अनुभव त्याचा । नच पुन्हा ।
ते वारे आले गेले। जन्माचे सार्थक झाले। परि गमे।
ते निमिष, स्थिती ती, सुख ते। चित्ताच्या दृष्टिस दिसते॥ सारखें! ॥
स्वानंद - कमलमकरंद। सुधानिस्यंद।
भूवरी आणी। जे वर्णावे ते कोणी । सुख तसे॥5॥

एकदाच अनुभव त्याचा । आरंभ अंत सौख्याचा। एकदां।
आयुष्य न त्याला क्षणही। जन्मही पुन्हां त्या नाहीं । एकदा ।
मनि चटका लावायासी। पाठवी दैव जणु त्यासी। एकदा।
निशिदिनी। वाटते मनीनित्य जन्मुनी।
मरण सोसावे । परि पहिले चुंबन घ्यावें । फिरुनिही॥6॥


=====================================================


एखाद्याचे नशीब

काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते ;
एकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते !

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हेमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला ;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवी यापरी
पाही कोण अशा हताश हृदया? जो तो असे आपला,
देवा ! तू तरि टाकि अश्रु वरुनी, त्यासाठी तो तापला !



~राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज