Thursday, July 21, 2011

काही कविता - कुसुमाग्रज



पृथ्वीचे प्रेमगीत 

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

~ कुसुमाग्रज
=====================================================
मंथर नाग

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग!

कधि लवचिक पाते खड्‍गाचे लवलवते,
कधि वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णांवर सुमने मोडुनि माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट!आनंद!
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तात नाहली,शिरमुंडावळ भाली
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर काली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान्‌ मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे,दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल,
अंगारकणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला!आला देख नकूल!

थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन्‌ आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी! की तडितेचा आघात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन्‌ पिशापरी त्वेषात!

रण काय भयानक, लोळे आग जळात!
आदळती,वळती,आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात!

क्षणि धुळीत गेली वहात तो विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वायापरि गेला नकुल वनातुनि दूर.

संग्राम सरे , रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!

~कुसुमाग्रज

=================================================
भेट अशी की...

भेट अशी की जिला पालवी
कधीच फुटली नाही
कोर शशीची घनपटलातून
कधीच सुटली नाही

मिठीविना कर रितेच राहिले
दिठीही फुलली नाही
ओठांमधली अदीम ऊर्मी
तशीच मिटली राही

युगायुगांचा निरोप होता
तोही कळला नाही
समीप येऊनी स्वर संवादी
राग न् जुळला काही

खंत नसे पण एक दिलासा
राहे हृदयी भरूनी
अलौकिकाची अशी पालखी
गेली दारावरूनी

~कुसुमाग्रज

'पाथेय' काव्यसंग्रहातून
============================================================
अनंत 
एकदा ऐकले काहींसें असें
असीम अनंत विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा इवला कण
त्यांतला आशिया भारत त्यांत
छोट्याशा शहरीं छोट्या घरांत

घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी
बांधून राहती कीटक कोळी


तैशीच सारी ही संसाररीती
आणिक तरीही अहंता किती?
परंतु वाटलें खरें का सारें?
क्षुद्र या देहांत जाणीव आहे
जिच्यात जगाची राणीव राहे!


कांचेच्या गोलांत बारीक तात
ओतीत रात्रीत प्रकाशधारा
तशीच माझ्या या दिव्याची वात
पाहते दूरच्या अपारतेंत!

अथवा नुरलें वेगळेंपण
अनंत काही जेंत्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं

वसंतवैभव उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा....प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें अंतरी झरे

त्यानेच माझिया करी हो दान
गणावे कसे हें क्षुद्र वा सान?

~ कुसुमाग्रज 
=======================================================
'कोलंबसचे गर्व गीत'

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
समुद्रा, डळमलु दे तारे !
विराट वादळ हेलकाउदे पर्वत पाण्याचे
ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान
मिळाया प्रमत्त थैमान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान

पदच्युता ,तव भिषन नर्तन असेच चालु दे
फ़ुटुदे नभ माथ्यावरती
आणि , तुटुदे अखंड ऊल्का वर्षावात अग्नी
नाविका ना कुठली भिती

सहकार्यानो, का हि खंत जन्म खलाशाचा
झूंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया लोटले
असे का आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधि सुखे , कशासाठी
जपावे पराभुत प्राणा

कोट्यावधी जगतात जिवाणु जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली
निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा ना रोधु शकतिल ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशान मिरवू महासागरात
जिंकु खंड खंड सारा !

चला उभारा 
शुभ्र  शिडे ति गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
” अनंत आमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला ”

~कुसुमा
ग्रज
=========================================================
बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते

असुराचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते

सह्यगिरीतिल वनराजांनो, या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायाला करा हिमाचल लक्ष खडे
समरपुरीचे वारकरी हो, समरदेवता बोलविते

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहात आजला एक मनीषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते
~ कुसुमाग्रज


1 comment:

  1. 'कोलंबसचे गर्व गीत' या कवितेतील

    की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान

    मिळाया प्रमत्त थैमान

    हि ओळ


    की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान

    मिळाया प्रमत्त सैतान

    अशी आहे

    ReplyDelete