Sunday, August 7, 2011

ज्ञानाचा उद्देश मनाला स्वतंत्र करणे


ज्ञानाचा उद्देश मनाला स्वतंत्र करणे
बी. जी. वाघ
विचारांच्या सावल्या
माणसे जर दिवस-रात्र कष्ट करत असतील, जीवनासाठी संघर्ष करत असतील, आपल्याला सत्ता, संपत्ती, सन्मान मिळावा, असे जर त्यांना वाटत असेल, तर कशासाठी? आनंदासाठी हेच त्याचे उत्तर आहे. सुखासाठी असेही त्याचे उत्तर आहे. आपण सुखी असावं, आनंदी असावं, असं कुणाला वाटत नाही? आपल्या जगण्याचा मूळ हेतू आनंद आणि आनंद हाच आहे. ऍरिस्टॉटलनंतर तीन विचारपंथ प्रामुख्याने पुढे आले, ते म्हणजे स्टोईक्‍स (stoics), एपिक्‍युरियन्स (Epecureans) आणि स्केप्टीक्‍स (sceptis). हे तीनही पंथ इ.स. पूर्वी चौथ्या शतकात प्रभावी होते. या पंथांचा प्रयत्न होता सुखांचा शोध. तो लागला त्यांना मनाच्या समतोलपणात किंवा स्थितप्रज्ञ अवस्थेत. 

एखादी गोष्ट करण्यासाठी अथवा स्वीकारण्यासाठी जितकी कारणे सांगता येतील तितकीच कारणे ती न करण्यासाठी अथवा ती न स्वीकारण्यासाठी सांगता येतात. त्यामुळे कुठलाही निर्णय माणसाला "अशांती'कडे घेऊन जातो. यावर उपाय काय? निर्णय टाळणे किंवा निर्णय प्रलंबित ठेवणे. पण ते शक्‍य आहे काय, याविषयी सखोल चिंतन करण्याची आवश्‍यकता असते. कुठल्याही क्रियेमुळे एक प्रतिक्रिया निर्माण होते. तिला भांबवण्यासाठी पुन्हा क्रिया करावी लागते. अशा तऱ्हेने माणूस क्रिया-प्रतिक्रिया यात विभागला जाऊन अशांत होतो.

एपिक्‍युरियन संप्रदायाचा संस्थापक एपिक्‍युरस (इ.स. पूर्व ३४१ ते २७०) याच्यापुढे बुद्धाप्रमाणेच प्रश्‍न होता दुःखाचा. माणसे दुःखी का होतात? ते अशक्‍य अशा गोष्टीमागे धावत असतात. निरर्थक गोष्टींचा हव्यास बाळगतात. म्हणून अधिकाधिक आनंद व कमीत कमी दुःख अशा पद्धतीने आयुष्याचे नियोजन करावे. त्याला सुखवादी तत्त्वज्ञान असेही म्हणतात. भारतीय तत्त्वज्ञानी चार्वाक संप्रदायासारखे हे तत्त्वज्ञान आहे. माणूस भयग्रस्त होतो, याचे कारण ईश्‍वर त्याचा राग-लोभ, त्याचे असणे-नसणे आणि भवितव्याविषयी असलेले प्रचंड अज्ञान. माणसाला भीती असते मृत्यूचीदेखील. एपिक्‍युरस या दोन्ही प्रकारच्या भीतीवर विजय मिळविण्यासाठी एक तत्त्वज्ञान निर्माण करतो. माणसाचा आणि ईश्‍वराचा काहीही संबंध नाही, असे तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. धर्माचा निसर्गव्यवस्थेशी संबंध प्रस्थापित करणे म्हणजे धोका (Terror) आहे, असे त्याला वाटते. आत्माहा परमाणूंचाच बनलेला असतो. मृत्यू म्हणजे या परमाणूंच्या संघटनाचा नाश. मृत्यूला घाबरू नये. कारण वेदनांपासून त्यामुळे स्वातंत्र्य मिळते. माणसाला भीती असते ती धर्माची, ईश्‍वराची, ईश्‍वरप्रणीत व्यवस्थेची व त्यांच्या व्यवस्थापकांची आणि मृत्यूची. कल्पना करा, की केवढी ही प्रचंड बंडखोरी आहे. आजही माणूस भयग्रस्त आहे आणि कारणे तीच आहेत. सर्व सृष्टी परमाणूंची असल्याने ती देवनिर्मित नाही. 
ज्ञानाचा उद्देश माणसाचे मन भय, परंपरा, अंधश्रद्धा यातून मुक्त करून मनाला स्वतंत्र करणे होय.

माणूस म्हणजे गाडीला बांधलेले कुत्रे. शहाणा असेल तर गाडीबरोबर पळेल, या स्टोईकांच्या वचनात त्यांच्या विचाराचे सार आहे. माणसाचे परिस्थितीवर नियंत्रण नसते; पण आपल्या विकारांवर असते. म्हणून मनाची शांतता ढळू न देणे, संघर्ष टाळणे जीवनात आवश्‍यक असते. विश्‍वातील सर्वव्यापी शक्ती आहे लोगॉस (Logas). विचारतत्त्व ते जडतत्त्वांपासून बनलेले असते. जडद्रव्य हे एकमेव वास्तव आहे. आपल्यावर होणारे आघात शांतपणे, धैर्याने सहन करणे म्हणजे स्टोईकवाद.

झेनो या चौथ्या शतकातील विचारवंताने आत्मा आणि ईश्‍वर या दोघांनाही जडद्रव्य मानले आहे. त्याचप्रमाणे सद्‌गुण आणि न्याय यालाही तो जडद्रव्यच मानतो. एका अर्थाने भौतिक विज्ञानाचा पायाच या विचारवंतांनी घातला आहे. भौतिकशास्त्रातूनच त्यांचे अध्यात्मशास्त्र उदयास आले. ही त्यांची बौद्धिक झेप तत्त्वज्ञानाच्या इतिहासात असाधारणच म्हणावी लागेल.

परिश्रमातून आनंद निर्माण होत असतो,क्रोधातून किंवा आळसातून नव्हे. सतत काम करत राहिल्याने मनुष्याचे जीवन सुखी बनते.- रस्किन

दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या अनेक हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. - स्वामी विवेकानंद

No comments:

Post a Comment