Tuesday, June 21, 2011

गाई पाण्यावर -कवी बी

गाई पाण्यावर
==========================


गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"

पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?

नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी

प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

"गावी जातो" ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा" 

-कवी बी  
कवी बी ( नारायण मुरलीधर गुप्ते )
जन्म : १-६-१८७२
मृत्यू : १६-८-१९४७

केशवसुतांच्या परंपरेतील कवी 'बी' यांच्या कवितेचे अध्यात्म, प्रेम, कुटुंब, समाज व इतिहास हे प्रमुख विषय आहेत. अध्यात्मप्रवणता व तत्त्वज्ञानाची ओढ यामुळे त्यांच्या काव्यावर चिंतनशीलतेची छाया पसरली आहे. त्यांनी काही काव्यभाषांतरेही केली आहेत. 'बीं' च्या रचनेवर संस्कृत-इंग्रजी भाषांतील काव्ये, भारतीय तत्त्वज्ञान व संतसाहित्याचा प्र्भाव पडला आहे. कर्तव्यप्रेरक व उदात्त आशावाद, प्रखर पुरोगामित्व, प्र्वृत्तिपर अध्यात्मावर आधारलेली जीवंदृष्टी, वेचक शब्दांत व्यक्ती व प्रसंगांचे चित्रण करण्याचे कौशल्य, संस्कृतप्रचुर ओरौढ भाषेतील संयत भावनाविष्कार, पांडीत्य व रसिकता यांचा मनोज्ञ संगम, मार्मिक, सौंदर्यदृष्टी, अभिजात काव्यप्रेम आणि आधुनिक मराठी काव्याविषयी प्रकटणारा अभिमान ही 'बी' कवींच्या काव्याची ठळक वौशिष्ठ्ये आहेत

No comments:

Post a Comment