!!जयोस्तुते श्री महन्मंगले !!
जयोस्तुते
जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती, त्वामहं यशोयुताम् वंदे ॥धृ॥
राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीति संपदांची
स्वतंत्रते भगवती, श्रीमती राज्ञी ती त्यांची
परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखती
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतंत्रते भगवती, तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभिर्यही तूची
स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेची
मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती, योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती, सर्व तव सहचारी होते
हे अधम रक्तरंजिते, सुजनपुजिते, श्री स्वतंत्रते
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमिला दृढालिंगना कधी देशील वरदे ॥१॥
हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रीडा तिथे करण्याचा का तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसें करण्याला
सुधाधवल जान्हवीस्रोत तो का गे त्वां त्याजिला
स्वतंत्रते, या सुवर्णभूमित कमती काय तुला
कोहिनुर चे पुष्प रोज घे ताजे वेणीला
ही सकल श्री संयुता, अमुची माता, भारती असता
का तुवा ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्याची दासी झाली
जीव तळमळे, का तू त्याजिले उत्तर याचे दे
स्वतंत्रते भगवती, त्वामहं यशोयुतां वंदे ॥२॥
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
No comments:
Post a Comment