सत्य मी जेव्हा लिहाया लागतो
हात माझा थरथराया लागतो
त्यास जेव्हा पाहतो जवळून मी
तो मला माझा दिसाया लागतो
आजही झालो ऋतूने धुंद की,
आजही मी गुणगुणाया लागतो
रोज हल्ली चालते माझे असे
झोपलो की बडबडाया लागतो
वाटते जेव्हा रडावेसे मला
त्याचवेली मी हसाया लागतो
संकटांनी झोडले ‘खावर’ तरी
मी पुन्हा उठुनी जगाया लागतो
बदिउज्जमान खावर
=============================================================
तीच तीच दृश्ये अन् तेच तेच देखावे
सर्व सारख्या वस्त्या; सर्व सारखीच गावे
कोरड्या नद्या सर्व, कोरडी मने सारी
श्रावणातही कोठे न राहिले ओलावे
रोज रोज शब्दांचा खेळ हा कशासाठी?
रोज रोज कसले हे अर्थहीन मेळावे
रंग हा असा आहे, गंध तो तसा आहे
रोज हे वसंताचे एकतोय सांगावे
एकही गुन्हा त्याचा सिध्द जाहला नाही
व्यर्थ शेवटी ठरले सर्व आमुचे दावे
सत्य हेच आहे, ती आमुची कथा होती
आमुची जरी नव्हती त्या कथेतील नावे
बदिउज्जमान खावर
खावर - चार माझी अक्षरे या संग्रहातून
==================================================================
जो पाहतोय त्याला दिसतोय वेगळा मी
सारेच देव येथे; माणूस एकटा मी
पायात गुंतलेल्या रस्त्यास काय सांगू
का न् राहिलो कुठल्या वळणावर् उभा मी
इथल्या परंपरेशी जुळले ना सख्य माझे
या बेगडी जगाचा झालो न सोयरा मी
रस्ते अजून इथले माझ्या न ओळखीचे
शहरामध्ये जरी या, ना राहिलो नवा मी
माझा बचाव माझ्या हाती न राहिलेला
प्रेमात रंगलो; हा केला खरा गुन्हा मी
बदिउज्जमान खावर
==================================================================
काजव्यांना अंतरीची वेदना सांगू कशी?
एकटा मी, पावसाची रात ही काढू कशी?
आसवाचा थेंबही नेत्रात नाही राहिला
ही मनाला जाळणारी आग मी विझवू कशी?
बोचणारया़ कंटकांनी व्यापलेले रान हे
मी जरी वेडा फुलांचा; मी फुले वेचू कशी?
साहवेना आणखी आता जऱी काळोख हा
रोशनीसाठी घराला आग मी लावू कशी?
कोंडलेले शब्द माझे माझिया छातीमध्ये
दूर गेले लोक, त्यांना साद मी घालू कशी?
सावलीसुध्दा न 'खावर' सोबतीला
हाय मी अंधारलेली वाट मी कापू कशी?
बदिउज्जमान खावर
===============================================================
सिद्धार्थही न उरलो मी बुद्धही न् झालो
सोडून राजवाडा नाहक वनात आलो!
माझी मला ठिकाणे माहीत सर्व होती
कोठेच तरीही नाही मला मिळालो
आला असा अचानक पाऊस मध्यरात्री
बाहेरच्या सरींनी मी आत चिंब झालो
माझ्यावरी तुझे हे रुसणे उगीच आहे
काहीच वावगे मी नाही तुला म्हणालो
लोकांस भेटतांना आले रडू मलाही
सोडून गाव जेव्हा मी यात्रेला निघालो
माझ्या विरुद्ध 'खावर' फिर्याद मीच केली
घेउन मीच मजला न्यायालयात आलो
बदिउज्जमान खावर
=================================================================
मी राहतो कुठे हे सांगू कसे जगाला?
पत्ता अजून माझा नाही मला मिळाला
मन पेटवून केली होळी जरी मनाची
छातीमधून माझ्या ना धूरही निघाला
हे दुःख अंतरीचे बोलू तरी कुणाशी?
ही वेदना मनाची सांगू तरी कुणाला!
कोठे असेल त्याचा मुक्काम कोण जाणे
शोधू कुठे कुठे त्या भटक्या मुशाफिराला?
जातो जिथे जिथे तो वेषात प्रेषिताच्या
छळतात लोक सारे वेडा म्हणून् त्याला
उरला अता न "खावर" तो रंग मैफिलीचा
गझला नव्या नव्या या लिहीतोस तू कशाला?
बदिउज्जमान खावर ("चार माझी अक्षरे" या संग्रहातून)
=======================================================================